गझल हा मुळात उर्दू भाषेतील काव्यप्रकार मराठीत आला, रूजला, फुलला, बहरला आणि रसिकांनी उचलून धरला. मराठी गजलेला लोकमान्यता मिळवून देण्याचं श्रेय कविवर्य सुरेश भट यांच्याकडे जाते. त्यांचीच प्रेरणा घेऊन कांचन ओझे यांनी लिहिलेल्या काही मराठी गझला.
गावामध्ये हिंडून थोडी दु:खे आणतो उधार,
त्या दु:खांच्या दगडांवर शब्दांना करतो धार,
त्या शब्दांच्या रचना करुनी ओळी लिहितो चार,
ऐकून मित्र म्हणतात, "क्या गझल लिखी है यार!"

या गझलेला चाल लावून गायली आहे मुग्धा पेंढारकर यांनी.
प्रवास ही गझल श्री. रविन ओझे यांनीही वेगळी चाल लावून गायली आहे.



बरे झाले.
प्रेम करतांना तिच्यावर जगाची पर्वा नाही केली,
मला वाटते यामुळेच, ती माझी कधीच नाही झाली. :ध्रु:
दांडया मारून कॉलेजला, फिरलो तीच्या मागेमागे,
परिणाम व्हायचा तोच झाला, डिग्री हाती नाही आली. :१:
काम नाही, धंदा नाही, पदरी फक्त निराशा आली,
माझ्यासारखेच भेटले काही, त्यांच्या सोबत नशा केली. :२:
शायरी केली, लिहल्या गझला, रोज नव्या तिच्यासाठी,
धूळ खात पडल्या फळीवर, त्यांना नाही कोणी वाली. :३:
सखे सोयरे दूर गेले, खिसा सुद्धा झाला खाली,
खळगी भरण्या या पोटाची, करू लागलो मी हमाली. :४:
सिग्नल क्रॉस करत होतो, समोर तिची ऑडी थांबली,
तेंव्हा वाटले, बरे झाले, ती माझी कधीच नाही झाली. :५:

वेदना
त्या आठवणींनी नयनी, अश्रूंची होते दाटी,
युगे लोटली, नाही फुलले, स्मितही माझ्या ओठी.
आले निघून जरीही, सोडून संगत त्याची,
प्रत्येक पावलाला, मी वळून पाहिले पाठी.
काय सांगू माझे, काळीज तिळतिळ तुटे,
कातरवेळी त्याच्या, आठवून साऱ्या गोष्टी.
जीवनधारा माझी, झाली दुःखांची सरिता,
सागरास वेदनांच्या, साठविले मी पोटी.
आठवणी
फुलविती मनात चांदणे, तुझ्या आठवणीं
सुखवीती हृदया तरीही का येते डोळा पाणी! |धृ.|
छंद तुजला पाहण्याचा चोरट्या नजरेतुनी
साठवूनी ठेविल्या मी लाख प्रतिमा या मनी . |१|
स्वप्नी पहात होते मी नेहमीच तुजला
तरीही जेथे तेथे तू दिसशी जागेपणी. |२|
त्या भाग्यमयी दिवशी, ती भेट आपली पहिली
समोर येता हृदये दोन्ही, धडधडली एक सुरांनी. |३|
मग अनेक गाठीभेटीं, ते स्पर्श तुझे ओझरते
कानात रुणझुणे अजूनी तुझी गोड ती वाणी. |४|
परी मीलन नव्हते नशीबी, हा दोष कुणाचा नाही
भाग्यातच लिहीली होती, संकटे आणि अडचणी. |५|
वळणावर एका झाले, मार्ग वेगळे आपले
ना दोष तुझा ना माझा, जे घडले ते नशिबानी. | ६|
कधी एकांती, कधी राती, कधी अशाच कातरवेळी,
तो गंध प्रीतीचा पहिल्या, दरवळतो मनात अजूनी . |७|
सुंदरा
गालावरच्या गोड बटांना, कानामागे वळवू नको,
मासोळीसम सुंदर डोळे, काजळ घालून मळवू नको. ॥धृ ॥
गोरी काया, सुरेख बांधा, नजरा साऱ्या तुझ्याकडे,
लाजत हासून, त्या नजरांना,तुझ्याच पाशी खिळवू नको.॥१ ||
मंद मंद तू चाल जराशी, घे विसावा मधे मधे,
नाजूक नाजुक काया तुझी ही, उगाच कधीही शिणवू नको. ॥२॥
सुरेख सुंदर मुखडा ठेवी, झाकुन थोडा पदराने,
चंद्र नभावरती पुनवेचा, नको, तया लाजवू नको. ॥३॥
गुलाब फुलला बागेमध्ये, सौंदर्याचा गर्व तया,
तुला पाहता मलूल झाला, अशी कुणाला जळवू नको. ॥४॥
उठता निजता तुझी आठवण, स्वप्ना मध्ये तुझेच दर्शन,
पुढे रातभर तळमळ, तळमळ, निद्रा माझी पळवू नको. ॥५॥
निरोप
मी दिलेला गजरा, केसात माळला नाही,
भाव माझ्या मनीचा, तिला कळला नाही.
गाव सोडण्याचा तिचा, इरादा ढळला नाही,
तिच्या वियोगाचा, माझा योग टळला नाही.
भेट होती आखरी, साक्षीस नगरी सारी,
हात हाती घेण्याचा, मोह टळला नाही.
नजरेस लावूनी नजर, डोकविले अंतरंगी,
नेत्रात तिच्या एकही, अश्रू तरळला नाही.
निरोप घेतांना तिचा, शब्द एक न फुटला ,
मला तिच्या मौनाचा. अर्थ कळला नाही!
ओझे
जीवनभर मी सदा वाहिले, ओझे अवजड मणा मणांचे,
नकोच होते, कधीच मजला, श्रेय त्यातले एक कणाचे.
उदार होऊन देती मजला, होते जे माझ्या हक्काचे,
उपकार असले ओंझळीमधे, साठलेत हो किती जणांचे.
भेटून कोणी कट्ट्यावरती, डोस पाजती अध्यात्माचे,
जाईन हासत नरकामध्ये, नकोत मज उपदेश कुणाचे.
भरून आल्या जखमा साऱ्या, फुंकरेविना कोणाच्याही,
तरी अजुनही असती बाकी, डाग कितीतरी खोल वणांचे.
चमक आपली मिरवत होते, होते जे सारे पितळेचे,
असूनी कांचन, घाव सोसले, ऐरणीवरी किती घणांचे.

कांचन ओझे यांनी लिहिलेल्या ह्या गझलेला संगीत देऊन गायली आहे सौ. मुग्धा पेंढारकर यांनी,
इशारा मनाचा.
माझ्याच हो मनाने केला मला इशारा,
परावलंबतेला देऊ नकोस थारा.
कोणीही का म्हणावे तुजला अजाण आता,
चल हो पुढे जरा तू अन् खेळ डाव न्यारा.
तू डाव खेळताना पाहू नकोस मागे,
कर्तव्य भावनांचा मांडू नको पसारा.
तत्वात सत्व नाही, ते पाहिजे कशाला
जे तत्व स्वत्व नाशी त्याचा नको पुकारा.
दैवाने सोपविले कांचन लोहाराला
झेलू नको घणाला, संपव आज निद्रा.
मी
किनार्यावरी रोज लाटा मोजत बसतो मी,
चुका आपल्या आठवूनही रोज हसतो मी.
कुणी मोजली किती आजवर भंगून गेली स्वप्ने,
जगण्यासाठी नवीन स्वप्ने रंगवत असतो मी.
लोक म्हणती, पूर्ण रात्रभर फार घोरतो मी,
अरे, खरेतर, डोळे ऊघडे ठेवून निजतो मी.
का मागावे, काही तुजकडे, दगडाच्या देवा?
माणसातल्या माणुसकीला, रोज भजतो मी.
नसेन कोणी साहित्यिक वा, मी यशस्वी कवी,
मैफिलीमथे या रसिकांच्या नित्य गाजतो मी.
ती
रुसवे, फुगवे, वाद, कुरबुर दोघांमध्ये नित्य आहे,
तिचं निस्सीम प्रेम मजवर, हे चिरंतन सत्य आहे. ॥धृ ॥
सासर, माहेर, मित्रमंडळी, सर्वांसोबत सख्य आहे,
हळदीकुंकू असो की गटारी, सारखच अगत्य आहे. ॥१॥
मुद्दाम करून खोड्या थोड्या, त्रास देतो कधी कधी,
नंतर गंमत पहात बसतो, मीच जरासा व्रात्य आहे. ॥२॥
वादविवाद झाला तरी, आवाज कधी चढत नाही,
तिच्या क्रोधामधे सुद्धा, शांतपणाचे पथ्य आहे. ॥३॥
चूक असू दे कोणाचीही, नेहमी मलाच माफ करते,
प्रेमभराने मीही म्हणतो, तुझी ही कृती स्तुत्य आहे.॥४॥
कुणी विचारा, तिला कधीही, सांगेल आनंदाने.
यांच्यासोबत संसारात मी अगदी कृतकृत्य आहे. ॥५॥
मदनमंजिरी
तो सुगंधी मोगरा, शोभे तिच्या केसांवरी
घायाळ झाले किती, मोजा अरे कोणीतरी ।धृ।
चालताना पावलांचा, ताल भासे केरवा
पैंजणांचा रुणझुणीची, वाणी भासे वैखरी ।१।
गौर केतकी सम करांवर, लाल मेंदी रेखीली
कंकणाच्या किणकीणीला, ये सतारीची खुमारी ।२।
गोल मुखड्यावरी शोभे, नाक ते चाफेकळी
हासता उमले खळी, ती गोबऱ्या गालावरी ।३।
केस कुरळे पाहुनिया, लाजले ते मेघही
चंद्रकोरीसम तिलक तो, सजविला भाळावरी. ।४।
वेड लावी या जगाला, हाय तो कमनीय बांधा
आज या विश्वात साऱ्या, नाही तुजसम सुंदरी ।५।
भासे मला ही अप्सरा, ही उर्वशी, ही मेनका
शोधते मदनास का, धरतीवरी ही मंजिरी. ।६।
कळा काळाच्या
सोडून जी निघालो, ती त्यांची पंगत होती
हल्ली पसंत त्यांना परक्यांची संगत होती.
रेंगाळलो जरी मी, तेथे जरा जरासा,
हेटाळणीच माझी, तेथे रंगत होती.
बदनामी रोज माझी, करता कुणी थकेना,
कट्ट्यांवरील चर्चा, बाजारी रंगत होती.
गांवां मधील नजरा, आता विचित्र झाल्या,
प्रतिमा जनांत माझी, निष्कारण भंगत होती
देवासमान ज्यांना, मी मानले तयांची
वृत्ती पहा किती हो द्वेषाने झिंगत होती
जाणून सत्य ही त्यांची, भाषा तशीच होती,
जिव्हाही आरोपांची, मर्यादा लांघत होती.
तो काळ जीवनाचा, माझा मुळी सरेना
जणू काळ वेळ तेंव्हा, मंद रांगत होती
काळा परिस मोठा, नाही गुरू जगी या
काळाची काळी किमया, त्यांनाही जाळत होती
दरवाजा माझ्या मनीचा उघडा सदैव होता,
पण त्यांची बंद कवाडे, ही माझी खंत होती.
Leave a comment