संत ज्ञानेश्वरांनी ज्या भाषेचा अमृतातेही पैजा जिंकी असा गौरव केलेला आहे अशी ही मराठी भाषा, मातृभाषा म्हणून लाभलेला, मी एक भाग्यवंत! आपल्या मराठीला अत्यंत समृद्ध साहित्यिक वारसा लाभलेला आहे. अनेक लेखक, कवी, संत यांनी अगदी विपुल साहित्य आपल्यासाठी ठेवलेले आहे. अशाच महान लेखकांचे साहित्य वाचता, वाचता मलाही काही कविता सुचायला लागल्या. कविता आणि संगीत या मानवी जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत आपल्या भावना प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी कवितेपेक्षा अधिक चांगले साधन नाही एखादी चांगली कविता एखाद्या व्यक्तीचे पूर्ण आयुष्य बदलून टाकू शकते. जशा, जशा सुचल्या तशा मीही अनेक कविता लिहिल्या. लहानपणी शाळेत, नंतर कॉलेजात तर कधी मित्रांच्या कंपूमध्ये ऐकवल्या. कधी त्यावर टीका झाली, कुणी दुरुस्त्या सुचवल्या, तर कधी वाहवा झाली. अशा केलेल्या अनेक कविता कालांतराने विस्मरणात गेल्या. नंतर जसा हा डिजिटल जमाना आला तशा कविता संग्रहात राहायला लागल्या. त्या रसिकांपर्यंत पोहोचवून माय मराठीच्या सेवेसाठी माझा खारीचा वाटा उचलण्याच्या उद्देशाने, मी हे संकेतस्थळ सुरू केले आहे. सर्व रसिकांना नम्र विनंती की माझ्या कवितांवरचा आपला अभिप्राय जरूर नोंदवा.
विश्वाचे धाम
रोजच होते सकाळ आणि रोजच होते सांज, ग्रह तारे अन धरतीचे हे सदैव चाले काज. कुणी न थांबे एका जागी कुणी न करी विश्राम, गगन स्थिर हे आपल्या जागी या विश्वाचे धाम.
जग धरतीला म्हणते माता, भास्करा मानती शक्तीदाता, कुणी भजे ना कधी गगनाला, ना कुणी जपे ते नाम. गगन स्थिर हे आपल्या जागी, या विश्वाचे धाम.
मनात ग्रहताऱ्यांची भीती, जप, पूजा, अन् करती शांती, विशाल गगना कधी न भजती, पोथ्यांचे गुलाम, गगन स्थिर हे आपल्या जागी या विश्वाचे धाम.
कितीक कोटी आकाशगंगा करिती ज्याच्या अंगी दंगा कृष्णविवरे असून कितीही आपल्या जागी ठाम. गगन स्थिर हे आपल्या जागी या विश्वाचे धाम.
गगन अनंत, गगन अनादी, निराकार, निर्विकार अगदी, गगनेश्वराला आज करूया. कोटी कोटी प्रणाम. गगन स्थिर हे आपल्या जागी या विश्वाचे धाम.
कांचन ओझे लिखित काही गीते
बकुल पंडित यांनी कोणत्याही साथी शिवाय हे गीत गायलेले असून या गीताला संगीत दिले आहे त्यांची शिष्या मूग्धा पेंढारकर यांनी.
घेऊन काय जाशील
जन्म घेतला तेंव्हा होते हात दोनही रिक्त घेऊन काय जाशील जेंव्हा होईल आत्मा मुक्त ||ध्रु.||
व्यर्थ जमविली सारी माया, झिजविलीस ज्या साठी काया, या मायेच्या मोहा पायी आटविले किती रक्त, घेऊन काय जाशील जेंव्हा होईल आत्मा मुक्त ||१||
सखे सोबती चिते पर्यन्त, नात्यांचा हो तिथेच अंत, ढाळतील ते तुझीया नांवे, चार आसवे फक्त, घेऊन काय जाशील जेंव्हा होईल आत्मा मुक्त ||२||
कांचन काया तुझी देखणी, अग्नि मध्ये देतील सोडूनी, अर्धांगिनीही विसरून जाईल, करून दू:ख व्यक्त, घेऊन काय जाशील जेंव्हा होईल आत्मा मुक्त ||३||
राव रंक वा कोणी नृपवर, सारे पाहुणे या पृथ्वीवर, परतून जाता सोबत नेतील, कर्मे आपुली फक्त, घेऊन काय जाशील जेंव्हा होईल आत्मा मुक्त ||४||
कृष्णाच्या खोड्या काढण्या मुळे राधा त्याच्यावर रागावली आहे. कृष्णाची बासरी तिच्या हाती पडली आहे. ती त्याला बासरी देत नाहीये, कृष्ण विनवणी करतो आहे, आपल्या खोड्यांचे द्वाड पणे समर्थन करतो आहे.
दे गं माझी वेणु
आजवरी मी माझी वेणु जपली प्राणापरी,
कळेना कशी आली अवचित राधे तुझिया करी,
सोड आता हा रुसवा, नको गं इतुके ताणू,
दे ग माझी वेणू, राधे, दे ग माझी वेणू. ॥१॥
गाई, वासरे चरण्यासाठी, इकडे तिकडे जाती रानी,
मुरलीचे सुर ऐकुनी येती, सायंकाळी आपुल्या स्थानी,
राधे सांग, वेणु विना कशा, परतुनी येतील धेनु?
दे ग माझी वेणू, राधे, दे ग माझी वेणू. ॥२ ॥
काल सकाळी, तुला भेटण्या, आलो होतो तुझिया द्वारी ,
क्षुधाक्रांत मी होतो म्हणूनी , केली नवनीताची चोरी,
तुझिया, घरचेच लोणी ते, आपले कसे न मी मानू?
दे ग माझी वेणू, राधे, दे ग माझी वेणू. ॥३ ॥
घडा केवढा मोठा, तुझिया माथी किती गं ओझे,कांचन काया नाजूक तव ही, मन द्रवले गं माझे,
फोडला, मी याची करणे, रंग नको गं मानू,
दे ग माझी वेणू, राधे, दे ग माझी वेणू. ॥४ ॥
जीवन संध्या
जीवन संध्या सुरू जाहली, प्रसन्नता ही टिकेल का? हृदयी वसलेली ही तृप्ती, अंतिम समयी असेल का? ||ध्रु||
श्रीकृष्णाचा कर्मयोग मी आचरला सत्कामी, तो ही कठीण होता म्हणूनी, भक्ति मार्ग अनुसरला मी, त्या श्रद्धेची ज्योत तेवती, डोळे मिटता दिसेल का? हृदयी वसलेली ही तृप्ती, अंतिम समयी असेल का? ||१ ||
कर्मकांड केवळ अवडंबर, नकोच होते कधी मला, माणसात मी देव पहिला, ना पूजले केवळ दगडाला, हृदय शांत हे होण्याआधी, प्रसन्नतेने हसेल का? हृदयी वसलेली ही तृप्ती, अंतिम समयी असेल का? ||२||
काय माहिती पुढचा प्रवास असेल कैसा आत्म्याचा, स्वर्ग, नरक अन मोक्ष, मुक्ती हा खेळच केवळ शब्दांचा, देह सोडता या तत्वांचे, रूप खरे ते दिसेल का? हृदयी वसलेली ही तृप्ती, अंतिम समयी असेल का?
आयुष्याचा गाडा
आयुष्याचा गाडा चाले जीवनपथावरी, कधी धावे वायूवेगे, कधी कासवापरी ||ध्रु||
वृषभ दोन चलती सदैव , एक कर्म अन् दुजा दैव. दोघांच्या साथीने होते जीवनयात्रा न्यारी, आयुष्याचा गाडा चाले जीवन पथावरी, कधी धावे वायूवेगे, कधी कासवापरी . |१ |
समोर येती अनेक वळणे, मोह मायेची छद्मी कुरणे, टाळून साऱ्या या वळणाना धर्ममार्ग तू धरी , आयुष्याचा गाडा चाले जीवन पथावरी, कधी धावे वायूवेगे, कधी कासवापरी |२|
दडपण ध्येयाचे मनावर, कधी होई मग वेग अनावर, आवरण्या मग संयमरूपी लगाम धर रे करी, आयुष्याचा गाडा चाले जीवन पथावरी, कधी धावे वायूवेगे, कधी कासवापरी |३|
ध्येय भासते कधी दूरवर, दोन्ही चाके करती कुरकुर, हरीनामाचे वंगण करिते भीती दूर सारी, आयुष्याचा गाडा चाले जीवन पथावरी, कधी धावे वायूवेगे, कधी कासवापरी |४|
तसे पाहीले तर आगगाडीचे इंजिन म्हणजे एक निर्जीव वस्तु. पण त्याच्याकडूनही बरेच काही शिकण्यासारखे आहे. नीट विचार केला तर इंजिनासारखा गुरु नाही. ही कविता ऐकल्यावर तुम्हालाही पटेल.
इंजिन गुरु
असाच एकदा पहात होतो, मी एक आगगाडी, एक कल्पना, चमकुन गेली, मनामधे वेडी. ॥धृ॥
इंजिन धावे घेऊन पोटी, धगधगती ती आग, लागत नाही पहा जराही, डब्यास त्याची धग, जरा न थकता पहा कसे ते सर्व डब्यांना ओढी, असाच एकदा पहात होतो, मी एक आगगाडी, एक कल्पना, चमकुन गेली, मनामधे वेडी. ॥१॥
मुळी न थकता, पुढे पुढे ते वेगाने जाई, पुढे चालता, कधी चुकूनही, मागे ना पाही. ध्येयस्थानी पोचल्याविना, धीर ना सोडी, असाच एकदा पहात होतो, मी एक आगगाडी, एक कल्पना, चमकुन गेली, मनामधे वेडी. ॥२॥
डबे जोडले कितीक मागे, जणू सखे सोबती, घेऊन जाई त्या सर्वांना, बनूनी सांगाती. सोबत घेऊन जाई सकलां, कुणा मधे ना सोडी, असाच एकदा पहात होतो, मी एक आगगाडी, एक कल्पना, चमकुन गेली, मनामधे वेडी. ॥३॥
मार्गावरूनी कधी आपल्या, तसुभरही ना ढळे, लोहाने आखल्या मार्गावर नीमूटपणाने पळे. कशीही येवो हवा, आपला मार्ग कधी ना सोडी, असाच एकदा पहात होतो, मी एक आगगाडी, एक कल्पना, चमकुन गेली, मनामधे वेडी. ॥४॥
असाच भेटे सद्गुरू कोणी, जीवनात ज्याला, कधीच त्याला नाही बाधती, विषयांच्या ज्वाला. अपुल्या मार्गे नेऊनी लावी, भगवंताची गोडी, असाच एकदा पहात होतो, मी एक आगगाडी, एक कल्पना, चमकुन गेली, मनामधे वेडी. ॥५॥