काही कविता मनातच अंकुरतात, मनातच फुलतात आणि मनात कायमच्या घर करून राहतात. अशाच काही मनात उमललेल्या कविता.
तुला पाहते
जेव्हा कधी मी तुला पाहते
भासे शतजन्मांचे जुळले नाते. ॥धृ॥
भासशी कधी तू सागरा सारखा,
मी एक सरिता तू माझा सखा,
तुझ्या ओढीने मी सदा धावते,
जेव्हा कधी मी तुला पाहते
भासे शतजन्मांचे जुळले नाते. ॥१॥
तुझ्यावरी मी अशी प्रीत केली,
प्रीती मध्ये भूक निद्रा उडाली,
तुला आठवत रातभर जागते,
जेव्हा कधी मी तुला पाहते
भासे शतजन्मांचे जुळले नाते. ॥२॥
स्पर्श तुझा करे जादू खरी,
मृत्तीकाही बने सुगंधी कस्तुरी,
काया अशी मोहरू लागते,
जेव्हा कधी मी तुला पाहते
भासे शतजन्मांचे जुळले नाते. ॥३॥
समजून मजला तू बासरी,
ठेवी क्षणभर अधरांवरी,
सूरांची तुला मी सुरा पाजते,
जेव्हा कधी मी तुला पाहते
भासे शतजन्मांचे जुळले नाते. ॥४॥
भिजून घेऊ जरा
रुणझुण रुणझुण, बोलती पैंजण,
हाती काकणे करती किणकिण,
आग लावितो मनास श्रावण,
तशात आला समोर साजण,
हाती घेऊन मोगऱ्याचा धुंद गंध गजरा,
माळुन माझ्या केसांमध्ये निरखत माझा चेहरा,
हात घेऊनी हातात म्हणतो मजला निलाजरा,
बोलवती बघ तुजला,मजला सुरेख श्रावणधारा,
चल गं भिजून येऊ जरा,
चल गं भिजून येऊ जरा. ॥१॥
नकार देऊ कसा कळेना,
नजरेला ही नजर मिळेना,
धडधड हृदयाची थांबेना,
आवरू कशा प्रेम भावना,
छेडत होता लबाड साजण, हृदयाच्या तारा,
फुलू लागला हृदयी मग इश्काचा निखारा,
पाहून सारे बोले साजण, नको करू नखरा,
या बाधेचा एकच आहे नामी उतारा,
चल गं भिजून येऊ जरा,
चल गं भिजून येऊ जरा. ॥२॥
पदर घेऊनी माथ्यावरती,
हात देऊनी त्याच्या हाती,
गेलो दोघे गच्चीवरती,
झेलत धारा अंगावरती,
गिरक्या घेऊनी नाचत नाचत फिरलो गरा गरा,
वहात होत्या गालावरूनी त्याच्या श्रावणधारा,
ईर्ष्या त्यांची वाटुन त्यांना पुसले माझ्या पदरा,
साधुनी संधी, मिठीत घेऊन म्हणतो निलाजरा,
चल गं भिजून घेऊ जरा,
चल गं भिजून घेऊ जरा. ॥३॥
मन मंदिर
मंदिर नाही कोठे, मनाहून मोठे,
माया, ममता, करुणा जेथे सदैव दाटे. ॥धृ॥
कधी होते विशाल गगनाहूनी,
कधी जाते अंधारूनी,
सद्भावाच्या ज्योती पेटता
उजळे प्रकाशूनी.
मनाच्याच या लीलांची मग
मनास गंमत वाटे
मंदिर नाही कोठे, मनाहून मोठे,
माया, ममता, करुणा जेथे सदैव दाटे. ॥१॥
कधी कधी तर सुकून जाते
वठलेल्या वृक्षापरी,
आशेचे मग अंकुर फुटता
येई नवी उभारी.
घेण्यासाठी नवी भरारी
गगनही भासे छोटे.
मंदिर नाही कोठे, मनाहून मोठे,
माया, ममता, करुणा जेथे सदैव दाटे. ॥२॥
कधी उठती मनी वादळे,
दाटती मेघ काळे,
भ्रम, चिंता अन् शंकांचे
ऊठती असंख्य धुरळे.
शांतपणाने ध्यान धरता,
अंतरी तांबडे फुटे.
मंदिर नाही कोठे, मनाहून मोठे,
माया, ममता, करुणा जेथे सदैव दाटे ॥३॥
शरद ॠतु
माथ्यावरती इंद्रधनूची वेणी बांधीयली,
दिव्यतनूवर हिरवाईची शालही पांघरली,
खुलून दिसते मुखड्यावरती पश्चिमेची लाली,
स्वागत करण्या शरद ॠतुचे सृष्टी ही सजली. ॥१॥
बनुनी पैंजण, करती रुणझुण, निर्झर अन् नाले,
त्या तालावर काठावरती रानलता जणू डोले,
आनंदाने फुलून गेल्या रानफुलांच्या वेली,
स्वागत करण्या शरद ॠतुचे सृष्टी ही सजली. ॥२॥
गोड गारवा घेऊन वाहे पवन मंद मंद,
चराचरातुन भरून वाहे अवघा मृद्गंध,
अंबरभाळी चंद्रकोरीची बींदी अशी लावली,
स्वागत करण्या शरद ॠतुचे सृष्टी ही सजली. ॥३॥
केशर घालूनी सडा शिंपला पूर्व दिशेला कोणी,
क्षितिजावरती पहा तेवते शुक्राची चांदणी,
प्रभा पसरता दिनकराची तीही किती लाजली,
स्वागत करण्या शरद ॠतुचे सृष्टी ही सजली. ॥४॥
शेत वावरां मधून पसरे सुखद एक गंध,
पात्यांवरती कणसे, लोंब्या डोलती होउन धुंद,
धरा भिजवूनी शीतल करण्या वर्षेची सर आली,
स्वागत करण्या शरद ॠतुचे सृष्टी ही सजली. ॥५॥
कुरळ्या कुरळ्या केसांसम ते मेघ नभी शोभती,
करा भास्कराचा तो शोभे प्रभात समयी हाती.
उन कोवळे पडता तनुवर अवनी सुखावली,
स्वागत करण्या शरद ॠतुचे सृष्टी ही सजली. ॥६॥
स्वप्न सखी
वैशाखातही भर दुपारी, पसरे चांदणे,
आठवते मज जेंव्हा, जेंव्हा, रूप तुझे देखणे. ॥धृ॥
दिसे खुलूनी, नाजूक बिंदी, गोऱ्या गोऱ्या भाळी,
जरा हसता, गोड उमटते, गालावरती खळी,
बघत रहावे, सदैव वाटे, मधुर तुझे हासणे,
वैशाखातही भर दुपारी, पसरे चांदणे,
आठवते मज जेंव्हा, जेंव्हा, रूप तुझे देखणे. ॥१॥
कर्णभूषणे शोभून दिसती कानी मोत्यांची
सुवर्ण कंकण, वाढवी शोभा नाजूक हातांची,
मयूरालाही लाजविणारे डौलदार चालणे,
वैशाखातही भर दुपारी पसरे चांदणे,
आठवते मज जेंव्हा जेंव्हा, रूप तुझे देखणे. ॥२॥
हासून बघता मुखात शोभे, कुंदकळ्यांची माला,
चाफेकळीही लाजून गेली, पाहून तव नाकाला,
साऱ्या जगता मोहविणारे, गोड तुझे बोलणे,
वैशाखातही भर दुपारी पसरे चांदणे,
आठवते मज जेंव्हा जेंव्हा, रूप तुझे देखणे. ॥३॥
नाजूक, नाजूक ओठ, जणू की कमळाच्या पाकळ्या,
कपाळावरी अखंड रुळती, बटा काळ्या, कुरळ्या,
पाहुनी तुजला, भरती उसासे, कितीतरी दिवाणे,
वैशाखातही भर दुपारी, पसरे चांदणे,
आठवते मज जेंव्हा जेंव्हा, रूप तुझे देखणे. ॥४॥
रुजली, सजली मनामधे ही, एक अनामिक सखी,
समोर नाही दिसली कधीही, अनोळखी, अनदेखी,
आवडे मना, सदैव तिजला स्वप्नातच पाहणे,
वैशाखातही भर दुपारी, पसरे चांदणे,
आठवते मज जेंव्हा जेंव्हा, रूप तुझे देखणे. ॥५॥
कांचन ओझे लिखित ह्या गीताला संगीत देऊन गायले आहे माधवी पोतदार यांनी.
आज होऊ दे गुन्हा
हे तुझे लावण्य सखये मोहवी माझ्या मना
त्या तुझ्या नयनांमधेही प्रीतीच्या काही खुणा,
जागविते तीच प्रीती यौवनाची चेतना,
आज होऊ दे गुन्हा, आज होऊ दे गुन्हा. ..१
आज हृदयातील ज्योती, का अचानक पेटल्या,
का प्रकाशित जाहल्या, या सोबतीच्या सावल्या,
वाहुनी ओसंडते ती, एक वेडी कामना,
आज होऊ दे गुन्हा, आज होऊ दे गुन्हा. ..२
पाहते ती चंद्रिका, अन् साद देती तारका,
मुक वाणी बोलती त्या, सांगती थांबू नका,
पाहण्या उत्सुक सृष्टी आज आपुल्या मिलना,
आज होऊ दे गुन्हा आज होऊ दे गुन्हा. ..३
सांगती त्या वृक्षवेली ऐक त्यांचे बोलणे,
पाप आहे या जगी हे व्यर्थ वेडे लाजणे,
ये मिठी मध्ये आता तू तोडूनी जगबंधना,
आज होऊ दे गुन्हा, आज होऊ दे गुन्हा. ..४
घडला गुन्हा
नयनांमधुनी वाहती माझ्या गंगा यमुना रे,
जीव जडला तुझ्यावरी, हा घडला एक गुन्हा रे ॥धृ ॥
कळेना कधी मना मनांचे, जुळले हे नाते,
मृगजळासही वेडे मन हे अमृत का मानते,
मी एक शापीत राधा आणिक तू माझा कान्हा रे,
जीव जडला तुझ्यावरी, हा घडला एक गुन्हा रे ॥१॥
गोड गुलाबी क्षण ते सारे तुझ्या सोबतीचे,
साखर पेरित वश करणारे बोल तुझे प्रीतीचे,
निरोप घेऊनी पाहिलेस ना, वळूनी तू पुन्हा रे,
जीव जडला तुझ्यावरी, हा घडला एक गुन्हा रे ॥२॥
बरसत असता श्रावणसरी या मन हे होते वेडे,
भेट आपली घडेल कधी हे मनास पडते कोडे,
तुझ्याविना हा श्रावण भासे शुष्क आणि सूना रे,
जीव जडला तुझ्यावरी, हा घडला एक गुन्हा रे, ॥३॥
अंतर्मनीच्या भावना कधी नाही केल्या व्यक्त,
मनात रुजला मनात फुलला प्रीतीचा प्राजक्त,
मातीत मिसळणे प्राजक्ताचा छंद हा जुना रे,
जीव जडला तुझ्यावरी, हा घडला एक गुन्हा रे, ॥४॥
करोंना काळात लिहिलेली ही एक लावणी.
क्वारंटाईन
मी करून श्रृंगार सोळा, स्वप्नात हो तुमच्या येईन
हृदयात साजणा तुमच्या मला करा हो क्वारंटाईन. ।धृ।
जरी राखाल तुम्ही अंतर, टाकीन ईश्काचा मंतर,
पोचवीन तुमच्यापाशी माझ्या काळजातली थरथर.
मदनाच्या या बाणाने मन तुमचे जिंकून घेईन,
हृदयात साजणा तुमच्या, मला करा हो क्वारंटाईन. ।१।
जरी मास्क घालुनी तुम्ही, दिसलात कुठे ओझरते,
हृदयातुन तुमच्यासाठी, ही प्रीत पहा पाझरते,
तुम्ही एक इशारा करता, ही दुनिया सोडून येईन,
हृदयात साजणा तुमच्या, मला करा हो क्वारंटाईन. ।२।
एक भेट चोरटी व्हावी, ही मनिषा उरात आहे,
त्याचीच आर्तता सारी, या माझ्या सुरात आहे,
भेटीत हात मी हाती, सॅनिटायझर लावून देईन,
हृदयात साजणा तुमच्या, मला करा हो क्वारंटाईन. ।३।
हातात हात मग येता, श्वासात श्वास मिसळावे,
प्रीतीच्या लाटांनी मग, मनसागरी उसळावे,
ज्वर इश्काचा मग चढता, देईन अधरांचे व्हॅक्सीन,
हृदयात साजणा तुमच्या, मला करा हो क्वारंटाईन. ।४।
कन्याजन्म.
भूवरी आली स्वर्गा मधूनी एक तारका खरी,
छोटीशी ही परी, पहा हो आली माझ्या घरी. (ध्रु.)
नवनीता सम नाजूक काया,
नयनांमध्ये उदंड माया,
हलवित छोटे हात सांगते, प्रेम करा मजवरी,
छोटीशी ही परी पहा हो आली माझ्या घरी (१)
चंद्रिके परी मुख ते घेउनी,
कृष्णमेघ जणू केश लेऊनी,
अवतरली ही नभामधूनी, विद्युत धरतीवरी,
छोटीशी ही परी पहा हो आली माझ्या घरी (२)
कमलदला सम ओठ हालवी
स्पर्शे सगळा शीण घालवी
धरता तिजला ऊरी, भासते स्वप्ने झाली खरी,
छोटीशी ही परी पहा हो आली माझ्या घरी. (३)
कुणी म्हणे ही कोमल कलिका
कुणास भासे शुक्र तारका
तव तेजाचा प्रकाश पसरो सदैव धरतीवरी,
छोटीशी ही परी पहा हो आली माझ्या घरी. (४)
कथा बुगडीची
(गवळण)
प्रभात समयी घेउनी घागर, गेले यमुना काठी,
दिसला तेथे कान्हा, होती अलगुज त्याच्या हाती.
किती गोपीका विनवीती त्याला वाजव ना रे पावा,
सांजवेळी मग देऊ तुजला, माखन आणिक मावा.
ऐकत नाही कान्हा पाहून खोडी मी केली,
अलगद पदराआड लपवली, मी त्याची मुरली.
आगळीक ही असे कुणाची, कान्हा मनात जाणे,
पहात होता मजकडेच तो, लटक्या रागाने.
काया माझी त्या नजरेने मोहरुन गेली,
पदरा मधुनी गळून पडली, की त्याची मुरली.
उचलण्यास मी जरा वाकले, कान्हा आला जवळी,
धरून ओढली त्याने माझ्या कानाची पाळी.
गडबडीत या फुटली घागर, भिजली साडी चोळी,
काना मधली बुगडी पडली, गेली यमुनातळी.
बुगडीमधे जडले होते, किमती हीरे मोती,
रागे भरतील घरचे आता, मनास वाटे भीती.
नाव कुणाचे घेऊ आणिक काय सांगू मी आता,
काय माहिती किती दुषणे देईल मजला माता.
भीत भीत मी घरात गेले, मान घालून खाली,
चर्या माझी पाहुनी आई गालातच हसली.
हासुनी बोले माता मजला, अशी कशी तू खुळी,
बुडून गेली यमुनाजळी, ती बुगडी नव्हतीच मुळी!
बुगडी रूपे बुडून गेली संचित कर्मे तुझी,
मोक्षाचा तव मार्ग मोकळा जिंकलीस तू बाजी.
त्या कृष्णाने आज ओढली तव कानांची पाळी
मोक्ष-मुक्ति चे भाग्यच लिहिले त्याने तुझिया भाळी
घागर रूपे धरली होतीस माथ्यावरती माया
फुटून घडले अमृत सिंचन, शुद्ध झाली काया
आरशात तू पहा जरा तव देह दिसे कांचन,
ओझे उतरे जन्मांचे अन आत्मा झाला पावन.
श्रीकृष्णाच्या बाललीलांवर कांचन ओझे रचित काव्यरूपात एक कथा. श्रीकृष्णाने एका गवळणीला दाखविलेल्या आपल्या लीला,
वसंत
नजर होती तिची मजकडे चेहऱ्यावरती स्मित,
फुलला वसंत मनामधे, अन् स्फुरले मजला गीत. ॥धृ॥
थोडी लाजून करीत होती, ती पदराशी चाळा,
पहात होती मजकडेच ती, वळूनी अनेक वेळा,
शोभत होती कानांमध्ये, कर्णफुले रंगीत,
फुलला वसंत मनामध्ये, अन् स्फुरले मजला गीत. ॥१॥
का भासली नयनामध्ये तिच्या अनामिक ओढ,
आवडले तिज काय कळेना, मलाच भासे गुढ,
वेड्या मनास भासे फुलली, तिच्याही मनी प्रीत,
फुलला वसंत मनामध्ये, अन् स्फुरले मजला गीत. ॥२॥
मना वाटले, धाडस करूनी, करावे तिला हाऽय,
विचारावे तिला जाऊनी, नांव तुझे गं काय?
चालू लागलो, तिच्या दिशेने, जरा भीत भीत,
फुलला वसंत मनामध्ये, अन् स्फुरले मजला गीत. ॥३॥
इतक्या मध्ये आला तेथे, तगडा एक तरुण,
हाय म्हणून त्याने तिजला, दिले की आलिंगन,
निघून गेले दोघे तेथून, घालुन हात हातात,
सरला वसंत मनातला, अन् विरले माझे गीत. ॥४॥