गडबड!
खरंच सांगतो काहीतरी, झाली आहे गडबड,
आजकाल छातीमध्ये, होत नाही धडधड. ॥धृ॥
रात्री उशिरा घरी येऊन, कारण सांगतो खोटे,
तरी सुद्धा तिचे डोळे, होत नाहीत मोठे.
करत नाही जरा सुद्धा, पूर्वीसारखी बडबड,
खरंच सांगतो काहीतरी, झाली आहे गडबड, ॥१॥
पूर्वी जर महिन्याचा, नाही लागला हिशोब
समजत नसे, कसा आवरावा, आता हिचा क्षोभ.
हिशोबाच्या डायरीची, आता संपली निकड,
खरंच सांगतो काहीतरी, झाली आहे गडबड. ॥२॥
कधी कधी व्हायचा आमचा, छोटा मोठा वाद,
पण आता तिने सोडून दिलाय, वाद घालायचा नाद,
ती गप्प बसली, की मलाच होतं अवघड,
खरच सांगतो, काहीतरी झाली आहे गडबड ॥३॥
रस्त्यात एखादी कडे पाहिलं जर मी वळून,
डोळ्यामधे राग तिच्या यायचा ऊफाळून,
हल्ली मात्र बांधुन बसते डोळ्यांवर झापड,
खरंच सांगतो काहीतरी, झाली आहे गडबड, ॥४॥
कथा दगडाची.
छिन्नी हातोडी टाकीचे मी सोशित गेलो घाव,
आशा होती देव म्हणोनी पूजेल मजला गांव.
दह्या दुधाने होइल मजला रोजच मंगल स्नान,
गंध पुष्प अन् हार घालूनी पूजा होइल छान.
शोभून दिसतील शरीरावरती मऊ रेशमी वस्त्रे,
हाती देतील शंख, गदा अन् धनुष्य बाण ही अस्त्रे.
सांज सकाळी होइल माझी धूपदीप आरती,
महाप्रसाद, नैवेद्य आणखी नाना खिरापती.
उभे राहतील समोर माझ्या जोडून आपले हात,
जय जयकार करतील माझा सारे एक सुरात.
मनामधे ही धरुनी स्वप्ने झेलत होतो घाव,
परी नियतीच्या मनात होता काही वेगळा डाव.
न्याहारी घेऊन आली एकदा मूर्तिकाराची पत्नी,
भाजी भाकरी होती परंतु नव्हती आणली चटणी.
याच कारणे सुरू झाला त्या दोघांचा तंटा,
भार्या म्हणे घरात नाही पाटा अन् वरवंटा.
कशी करावी तुम्हीच सांगा चटणी पाट्या विना
कारागीर तुम्ही, मज एखादा पाटा बनवून द्या ना!
ऐकून तीची सारी वचने फिरले त्याचे डोके,
रागाने मग मजवर त्याने बळे मारिले ठोके.
ठोके मारून केले त्याने तुकडे माझे दोन
तुकडा मोठा घेऊन त्याला केले पाच कोन.
सपाट मजला करूनी त्याने केला माझा पाटा,
लहान तुकडा तासूनी त्याचा केला वरवंटा.
उचलून आम्हा दोघांनाही घेऊन गेला घरी
सोपविले आम्हां दोघांना त्या गृहिणीच्या करी.
धुतले आम्हां तिने खरखरा घासून काथ्याने,
मूर्तीकार हे पहात होता उजळ माथ्याने.
मिरे, खोबरे, जिरे, लवंगा, मिरच्या आणि लसूण,
वाटू लागली मजवरी ठेवुन ऊकिडवी बसून.
या देहाची होऊ लागली अशी लाहीलाही,
दगड मनाच्या त्या नारीला दया आली नाही.
त्या वासाने मला भयंकर होऊ लागला त्रास,
किती सोसावा आम्ही असला महा नरकवास?
अशीच आमची चालू होती रोजच दिनचर्या,
कुणास आता सांगू आमच्या हालअपेष्टा साऱ्या?
बांधुनीया खूणगाठ, ठेवा एक गोष्ट एक ध्यानी
असे टाकीचे घाव सोसले कितीतरी दगडांनी.
उखळ झाले, जाते झाले, बनले कुणी घाणे,
पायरीचा दगड बनुनी कुणी, झेली पादत्राणे.
या सर्वांनी सोसलेच ना टाकीचे ते घाव?
प्राक्तन ज्याचे त्याचे, दुसरे काय द्यावे नांव!
नियतीचा हा खेळ सारा, नियतीचाच डाव,
लाखांमध्ये एकच होतो दगडाचा देव.
कंठीत होतो काळ, करूनी विचार असाच सारा,
परंतु एके दिवशी सरला, नशिबाचा हा फेरा
करीत होता मूर्तीकार तो, अखंड मेहेनत,
कालांतराने तो ही झाला, बराच धनवंत.
दारी त्याच्या उभी राहिली सुंदर एक दुचाकी,
पत्नीच्या हातावर आले सुवर्ण कंकण अन् वाकी.
भार्या त्याची बोले त्याला लाडाने बिलगुन,
म्हणे मजला आता द्या हो, मिक्सर एक आणून.
कशी गं येईल मिक्सरला, त्या तुझ्या हाताची चव?
नकोच काढू पुन्हा मजपुढे, मिक्सर चे ते नांव!
ऐसे बोलुन मूर्तीकार तो, टाळत होता नित्य,
तरीही जगी नित्य होतसे, स्त्रीहट्टच तो सत्य!
रुसून बसली एके दिवशी, बोलेना एक अक्षर,
नाईलाजाने मूर्तीकार मग, घेऊन आला मिक्सर.
पाहून मिक्सर, अगदी हरखून गेली ती नारी,
दिले टाकूनी मग आम्हाला, उघड्या रस्त्यावरी.
जात होता एक तेथूनी, सज्जन पांथस्थ,
दगड पाहून रस्त्यावरती, झाला अस्वस्थ.
ठेच लागुनी पडेल कोणी, काळजी त्याच्या मनी,
एका वृक्षाखाली मजला, दिले उभे ठेवूनी.
फुले उमलली होती काही, वरच्या फांद्यांवरी,
गळून पडली काही माझ्या, अंगा खांद्यावरी.
कितीतरी वर्षांनी माझ्या, नशिबी हा सुगंध,
फुलला माझा चेहरा, दाटे मनामध्ये आनंद.
लोक कितीतरी करीत होते, ये जा माझ्या पुढुनी,
कुणी पहाती जिज्ञासेने, कुणी जोडती कर दोन्ही.
आला एक तरुण, बहुदा गावामध्ये नवा,
लावून गेला मजसमोर तो, एक पेटता दिवा.
नंतर एका वृद्धालाही झाली मग उपरती,
लावून गेला मज समोर तो, अर्धी उदबत्ती.
हात जोडुनी बोले मजला, तिथला एक विधुर
मिळू दे मला दुसरी भार्या, लावीन तुझे शेंदूर.
स्थळ म्हणूनी सांगुन आली, विधवा एक सावळी,
पाहताच ती त्या वेड्याला, मनोमनी भावली.
लगीन केले त्याने सत्वर, मुहूर्त न पाहता,
अनायसेच झाला की तो, चार मुलांचा पिता!
या नवसाची किर्ती पोचली, अगदी दूर दूर!
जो तो येउन फासू लागला, मजला शेंदूर!
हार वाले, पेढेवाले, हळद कुंकू शेंदूर वाले
थाटून बसले नवी दुकाने, भवताली गजबजले.
दर्शन घेण्या होऊ लागले, भक्तही अधीर,
हळू हळू मग बनले माझे, भव्य मंदिर.
हा नशिबाचा फेरा सारा, नशिबाचाच खेळ,
दिवस बदलती प्रत्येकाचे, यावी लागते वेळ.
कचरावाली
नाही पाहिली आळंदी, ना देखीली पंढरी,
वारकरी मी जगावेगळी, न्यारी माझी वारी. ॥धृ॥
टाळ नाही, टिळाही नाही, झाडू धरते करी,
रस्त्यावरच्या पाचोळ्यातच भेटे मजला हरी. ॥१॥
भल्या पहाटे उठूनी निर्मळ करते नगरी सारी,
तुळस मानुनी, पाटी उचलूनी धरते माथ्यावरी. ॥२॥
नाही मागत शीधा, नाही मागत मी भाकरी,
घेऊनी जाते सारा कचरा, फिरूनी दारोदारी. ॥३॥
अंगिकारिली सेवा, समजुन देवाची चाकरी,
ओठी धरले नाम विठूचे, भक्ती भरली उरी. ॥४॥
कचरावाली म्हणती मज, जे कचरा निर्मिती घरी,
तरी मनी ना धरी खंत, मी वारकरी हो खरी! ॥५॥
नवे पसायदान.
बघता बघता व्यापत गेला कोपरा आणिक कोना
भरूनी राहिला भवताली हा भयंकर करोना.
करणी याची पहा पहा हो असे किती काळी
कोटी कोटी निष्पापांचे हा घेत राहिला बळी!
दहशत याची पसरत गेली साऱ्या जगतावरी
रस्ते पडले ओस माणसे बसली आपल्या घरी.
बंद दुकाने बंद वाहने बंद कारखाने
शांतपणाने जमिनी वरती उभी हो विमाने.
व्यवहार सर्व जगताचेही होउन गेले ठप्प,
औषध नाही, उपाय नाही शास्त्रज्ञही गप्प!
कुणी ठरविले याच्यासाठी दोषी वटवाघुळा
कुणी सांगती उगम याचा असे प्रयोगशाळा.
कळेना मला ऐकलेले सत्य की असत्य
मानवाने कसा निर्मिला असा एक दैत्य.
निर्मात्याला याच्या कसे म्हणावे शास्त्रज्ञ
मारून घेई कुऱ्हाड पायी असाच तो अज्ञ.
दुरूपयोग हा बुद्धीचा करी घात मानवाचा
शास्त्रज्ञ नव्हे हा असे सोयरा कुणा दानवाचा.
शास्त्रज्ञांनो द्या जगताला असे पसायदान,
शोधा ऐसा जिवाणू, की जो, होईल वरदान.
ऐसा एक विषाणू आता मानवनिर्मित व्हावा
जगभरामध्ये करोनाहुनी वेगे पसरावा.
याची बाधा जगता मधल्या प्रत्येका व्हावी
बाधा होता शत्रुत्वाची भावनाच जावी.
नवनिर्मित तया विषाणूमुळे असर ऐसा व्हावा
धर्म देश आणि जातीपातींचा विसर मानवा व्हावा.
मनी भरावा बंधुभाव अन् प्रेमही तुडुंब
सारी वसुधा होऊन जावी एकच कुटुंब!
सारी वसुधा होऊन जावी एकच कुटुंब!
सारी वसुधा होऊन जावी एकच कुटुंब!
गोड रुपडे रागावले
पाहतेस तू, जेंव्हा जेंव्हा, रागाने मजकडे,
गोड भासते अगदी मजला, सखे तुझे रुपडे. ॥धृ॥
अधिकच सुंदर दिसती डोळे,
त्यात रेखिले काजळ काळे,
गोड गोबऱ्या गालांवरही, सुंदर लाली चढे,
पाहतेस तू, जेंव्हा जेंव्हा, रागाने मजकडे,
गोड भासते अगदी मजला, सखे तुझे रुपडे. ॥१॥
मानेला एक देऊन झटका,
कटाक्ष टाकसी तू एक लटका,
पाहुनी तुझ्या, अशा या अदा, काळीज हे धडधडे,
पाहतेस तू, जेंव्हा जेंव्हा, रागाने मजकडे,
गोड भासते अगदी मजला, सखे तुझे रुपडे. ॥२॥
मुखडा सुंदर गोड गुलाबी,
नयन तुझे भासती शराबी,
नजरेला मग नजर मिळता, नशा मनाला चढे,
पाहतेस तू, जेंव्हा जेंव्हा, रागाने मजकडे,
गोड भासते अगदी मजला सखे तुझे रुपडे. ॥३॥
मुखड्यावर रागाची गर्मी,
परि हृदयी प्रेमाची उर्मी,
सांग कसा तू, या दोन्हीचा, मेळ राखसी गडे,
पाहतेस तू, जेंव्हा जेंव्हा, रागाने मजकडे,
गोड भासते अगदी मजला, सखे तुझे रुपडे. ॥४॥
Leave a comment