पाठवणी १
लेक लाडकी सासरी जाताना
रोखू कसे अश्रुंना..... (ध्रु)
तुझ्याविना हे घरटे आपुले होईल सुनेसुने,
बागे मधले पक्षी गातील गाणे केविलवाणे,
सीमा वेडी शोधत राहील तुझ्याच पाऊलखुणा,
रोखू कसे अश्रुंना...... (१)
तुझ्यासाठी करितो पखरण पारिजात पुष्पांची,
रातराणी ही करिते उधळण तुजसाठी गंधाची,
आम्रतरूही आता कसा ग मोहरेल तुजविणा,
रोखू कसे अश्रुंना..... (२)
प्रेमळ सासू, भले सासरे तुला लाभले आता,
तुझ्या सुखाची आम्हास पोरी मुळीच नाही चिंता,
परी विरहाची खुळी भावना पाठ काही सोडेना,
रोखू कसे अश्रुंना..... (३)
या दिवसांची वाट पाहिली कितीक वर्षे आम्ही,
गत जन्मीचे पुण्य कदाचित आले आहे कामी,
हा क्षण येता काळीज फाटे, रिवाज हा तर जूना!
वाहू दे अश्रुंना,
वाहू दे अश्रुंना.... (४)
पाठवणी ३
काय लिहू मी, शब्द न सुचती,
रुसली मजवर कविता,
सोडुनी आम्हां पहा निघाली
नव्या घरी अन्विता. ॥धृ॥
शालू, शेला लेऊन सजली
सुंदर ही नवरी,
नाजुक नाजूक मेंदी रेखीली
कोमल हातांवरी
मंगलमणी ते गळ्यामधे
अन् माथ्यावर अक्षता.
सोडुनी आम्हां पहा निघाली,
नव्या घरी अन्विता ॥१॥
सुखदुःखाच्या भाव भावना
मनात करती गुंता,
समाधान वाटे कधी,
तर कधी सतावे चिंता,
काळीज फाटे कानावरती
सनईचे सूर पडता,
सोडुन आम्हां पहा निघाली,
नव्या घरी अन्विता. ॥२॥
जिच्या रुपाने आम्हां गवसला
सर्व सुखाचा ठेवा,
कन्या इतकी सुलक्षणी की
जगास वाटे हेवा.
भरून आले डोळे दोन्ही,
निरोप तिजला देता,
सोडुन आम्हां पहा निघाली,
नव्या घरी अन्विता. ॥३॥
जशी शकुंतला कण्वाची,
जशी जनकाची जानकी,
प्रिय आम्हाला प्राणाहुन,
जी सर्वांची लाडकी
शोधत राहिल मन हे वेडे,
तिला घरी सर्वथा,
सोडुन आम्हां पहा निघाली,
नव्या घरी अन्विता. ॥४॥
पंख फुटता घरटे सोडुनी
उडुन जाती पाखरे,
निसर्गाचे चक्र सारे
असेच आहे खरे,
जेथे जाशील तेथून यावी,
तुझ्या यशाची वार्ता,
सोडुन आम्हां पहा निघाली,
नव्या घरी अन्विता. ॥५॥
पाठवणी २
काळजाच्या या तुकड्याची करता पाठवणी,
हृदयी भरला मोद, तरी का येते नयनी पाणी. (ध्रु)
फुले तोरणे रांगोळ्यांनी घर हे सुंदर सजले,
सनईचे ते मंगल सूरही काळीज भिजवून गेले,
मेंदीच्या रंगात रंगले हात मुलीचे दोन्ही,
हृदयी भरला मोद, तरी का येते नयनी पाणी. (१)
शालू शोभे अंगावरती रेशमी भरजरी,
दागदागीने खुलून दिसती गोऱ्या कांती वरी,
कन्या माझी आज भासते कोणी परीराणी,
हृदयी भरला मोद, तरी का नयनी येते पाणी. (२)
भरे कधी मन आनंदाने पण कधी उदास वाटे,
कन्या हे तर धन परक्याचे, हे ही नाही खोटे,
उजळून ठेवील ती सासरचे, घर ते बावनखणी,
हृदयी भरला मोद, तरी का नयनी येते पाणी. (३)
नशिबाच्या योगाने जुळली सुरेख सुंदर नाती
असे सुखाचे क्षण पहाण्या ममा हवी होती
घडले सारे मंगल केवळ तिच्या आशिर्वादानी
हृदयी भरला मोद, तरी का नयनी येते पाणी. (४)